येत्या २३ एप्रिल रोजी ‘ विश्व पुस्तक दिन’ साजरा होतो आहे त्या निमित्ताने. हा दिवस William Shakespeare ह्यांच्या जन्म आणि मृत्यू दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दरवर्षी एका शहराची वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून निवड होते या वर्षी तो मान strasbourg France कडे आहे. २००३ मध्ये तो दिल्लीला मिळाला होता. असे म्हणतात की अन्नदानं परं दानं विद्या दानं अतः परम् | अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्ययो || अर्थात अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे पण विद्यादान त्याहून श्रेष्ठ आहे. अन्नामुळे तात्पुरती तृप्ती मिळते पण विद्येने आयुष्यभराची. जगात ज्ञान मिळवण्याचे जे मार्ग आहेत त्यामधे पुस्तकरूपी ज्ञान सर्वत्र सहज उपलब्ध आहे . आमच्या लहानपणी social media नामक अक्राळविक्राळ राक्षसाने धुमाकुळ घातलेला नव्हता आणि whatsapp सारख्या स्वघोषित university पण नव्हत्या .माहिती मिळवण्याचे एकमेव महत्वाचे साधन म्हणजे वृत्तपत्रे आणि पुस्तके. त्यामुळे घरात वाचता यायला लागल्या पासून पुस्तके होती. आमच्या घरातल वातावरण कायम वाचनाला पोषक. मला वाचनाचे वेड माझ्या आई व मोठ्या भावामुळे लागलं. वडिल सरकारी नोकरीत असल्याने बहुसंख्य मध्यमवर्गीय घराप्रमाणे परिस्थिती होती. पुस्तक वाचणे व विकत घेण्यावर बंधने नव्हती. पण बरीचशी पुस्तके विकत घेण्याच्या आवाक्याबाहेर असल्याने वाचनाचे हक्काचे ठिकाण म्हणजे गावातले वाचनालय. आम्हाला एकावेळी दोन पुस्तक घेण्याची मुभा होती. पुस्तके घरी आणली की मी आणि माझा भाऊ ती अक्षरक्षः अधाशासारखी वाचून काढायचो. त्यामध्ये कादंबऱ्या, आत्मचरित्रे ,गुढकथा ,विनोदी ,युद्धकथा या सगळ्यांच्या समावेश असे. प्रामुख्याने सुहास शिरवळकर, रणजित देसाई, पुल, अत्रे, सावरकर, वाळिंबे, गडकरी, वपु, कानिटकर , रवींद्र भट अशा अनेकांची पुस्तके वाचनात आली. घरातल्या धार्मिक वातावरणामुळे अनेक धार्मिक ग्रंथ चरित्रे समजली. वयानुसार वाचनातली प्रगल्भता वाढत गेली हळुहळू नाटके, प्रेमकथा या बरोबरीने बरीच इंग्रजी पुस्तकेदेखील वाचली. पुढे इंजिनिअरिंग ला आल्यावर कराडला खुपच मोठे वाचनालय होते .तिथे काही संदर्भ ग्रंथ वाचत बसण्याची देखील मुभा होती. इथेच बऱ्याच इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे वाचायला मिळाली.सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्यसमर, मॅक्सिम गार्की, लिओ टॉलस्टॉय, जीए, महात्मा गांधी, हिटलर, लोकमान्य, चर्चिल, साने गुरुजी, कुसुमाग्रज ,लोकमान्यदेखील वाचता व समजता आले.इथेच भालचंद्र नेमाडेंचे कोसला वाचनात आले. तिथे सावरकरांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन ‘ सर्वसारसंग्रह’ वही बनवली त्यामध्ये वाचलेल्या पुस्तकाचा दिनांक आणि पुस्तकाचा सारांश लिहून काढत असे. वाचलेल्या पुस्तकांची यादी बघून उर अभिमानाने भरून येत असे.वाचनाबरोबरच मला ज्योतिष शास्त्राची पण आवड निर्माण झाली आणि या विषयाची देखील अनेक पुस्तके वाचुन काढली. आज थोड्याफार प्रमाणात ज्योतिष्यातली माझी प्रगती झाली ती केवळ पुस्तकरूपी गुरुमुळे. पुढे लग्न व कामाच्या व्यापात थोडे पुस्तक वाचन मंदावले. पण तरीदेखील कोणत्याही पुस्तक मेळ्याला भेटी देऊन पुस्तके विकत घेण्याचा क्रम चालू ठेवला होता. पुस्तकप्रेमींची आवडती ठिकाणे म्हणजे रद्दीची दुकाने किंवा फुटपाथवर विकणारे विक्रेते. त्यांच्या दृष्टीने ती रददी असते पण काही अमुल्य पुस्तके जी काही कारणास्तव मला मिळत नव्हती ती इथे मिळाली. Sherlock होम्स चे सगळे खंड हे पुस्तक फक्त २०० रुपयात मिळाले होते. Canada मध्ये आल्यावर पुन्हा ही वाचनाची भूक भागेनासी झाली. इथल्या Toronto मधल्या Library मध्ये काही इंग्रजी पुस्तके वाचली तसेच काही मराठी पुस्तके देखील मिळाली पण वाचनाला मर्यादा पडत होत्या.भारतात गेल्यावर किती पुस्तके घेऊन येणार? पुस्तकांनी बॅगांचे वजन वाढायला लागल्यावर गृहमंत्र्याच्या बोलीतला फरक जाणवल्यावर शहाण्याला शब्दांचा मार या न्यायाने काही पुस्तके निमुटपणे काढावी लागत. तरीदेखील मी शिताफीने काही पुस्तके आणण्यात अनेकदा यशस्वी झालो आहे. पण ती पुस्तके आणल्यावर लवकरच वाचून संपत .शेवटी त्यावर तोडगा म्हणून मी Amazon kindle चा पर्याय स्वीकारला.सुरुवातीला पुस्तक ते पुस्तक आणि हे काही आपल्याला झेपणार नाही असेच वाटत होते पण इथे देखील अचानक अच्युत गोडेबोलेंच्या पुस्तकांचा खजिना सापडला. पुन्हा २ किलोची पुस्तके सांभाळण्यापेक्षा २०० ग्रॅमच्या kindle मध्ये १०० पुस्तके बसतात. पुस्तकांनी आयुष्यात आजवर भरभरून आनंद दिला. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध केले. अनेकदा लेखकाच्या भावविश्वाशी समरस झालो. पुस्तकांच्या सोबतीने एकलकोंडेपणा कधी जाणवला नाही. चित्रपट माध्यमावर देखील पुस्तकांचा प्रभाव आहेच. उत्तम कथानक असलेले चित्रपट चालतात आणि उत्तम पुस्तकावरून बनवलेले चित्रपट गाजतात. अलीकडची उदाहरणे म्हणजे Harry potter,३ idiots.पुस्तक वाचनाचा परिणाम मानवी मेंदू व भावनांवर होतो हे शास्त्रज्ञांनी देखील सिद्ध केलेले आहे. भुतकाळामध्ये नालंदा सारखी विश्वविद्यालये व अमुल्य ग्रंथ जाळले गेले व येणाऱ्या पिढ्यांचे किती नुकसान झाले ते सांगता येणे कठीण आहे. त्याचबरोबर राजकीय वैमन्यसातून देखील पुस्तक प्रेमींचे व ग्रंथालयांचे नुकसान झाले. मागच्या काही वर्षात शालेय व तरुण मुलांमधले पुस्तकाचे वेड कमी होत चालले आहे ते smartphone च्या आक्रमणाने. त्यांना परत पुस्तकप्रेमाकडे ओढण्यासाठी ग्रंथ चळवळी ची गरज आहे. तसेच मुले अनुकरणप्रिय असतात त्यामुळे पालकांना त्यांच्या कृती मधून पण हे सिद्ध करावे लागेल. प्रख्यात इंग्लिश ग्रंथकार James Addison म्हणतो Reading is to mind what exercise is to body. अनेक मानसिक रोगदेखील बरे करण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्याप्रमाणे ज्ञानदेवांनी सांगितले आहे एक तरी ओवी अनुभवावी या न्यायाने वाचन ज्योत तेवत ठेवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे आज आपल्याला संजय उपाध्ये सरांसारखे उत्तम अध्यक्ष लाभले आहेत. Sir ७ वर्षापूर्वी मराठी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आले होते आणि ओघवत्या शब्दात त्यांनी श्रोत्यांना आपलेसे केले. ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या अफाट वाचनाचा परिणाम नक्कीच असणार. आयुष्यात यशस्वी झालेल्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीवर वाचनाचा परिणाम आहेच. उद्याचे लेखक हे आजचे वाचक असतात.प्रसिद्ध विचारवंत जॉन रस्किन म्हणतो, “पुस्तक नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं.” डॉक्टर आंबेडकरांचे वाक्य तर प्रसिद्धच आहे ‘ वाचाल तर वाचाल’. असे म्हणतात की माणसाला आयुष्यात दोन गोष्टी हुशार बनवतात. एक वाचलेली पुस्तके आणि दूसरे म्हणजे भेटलेली माणसे. भेटणाऱ्या माणसांवर आणि त्यांच्या वागण्यावर तुमचे नियंत्रण नाही पण तुम्हाला हवी ती पुस्तके निवडण्यावर आणि वाचण्यावर कोणाचेच बंधन नाही. R.R. Martin यांचे प्रसिद्ध वाक्य आहे A reader lives a thousand lives before he dies. The man who never reads lives only one. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी म्हटलेच आहे या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविती माणुसकी अन् ग्रंथ शिकविती शांती ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा विवेक राघवेंद्र कुलकर्णी
Share This Post