Name: – Rohini Mahesh Kumbhar
विषय: – स्नेहबंध २०२४
साहित्य प्रकार: – कविता
शीर्षक – माझी आजी
ऊन असो वा सावली ती सोन्यासारखी चमकायची
तिचं क्वचितच हसणं म्हणजे पर्वणीच
मनापासून आवडायचं तिच्यासोबत राहणं
बालपणीचा खेळ तिच्या मागे-मागे जाणं
तिचा हात नेहमीच वाटायचा आसरा
तिचा पदर म्हणजे सुखाचा पहारा
तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अनुभवांची लकेर असायची
तिच्या गोष्टींमधून ती शिकवणींची बखर मांडायची
नऊवार लुगड्यात सजणारी नि विभूती ल्यालेली
माझी वैजयंतीची जपमाळ माझी आजी
माझ्या स्मृतीत आहे अजूनही तशीच ती
अंतरी कुठेतरी अंमळ जिवंत ती…
शीर्षक – माणुसकीची परफट
पदोपदी माणसाला
येई माणसाची चीड
तिथं पशु पक्षांची हो गत
काय सांगावी
गर्वाच्या भिंती होती
भरभक्कम इतुक्या
तिथं नात्यांची ती गत
काय सांगावी
नकली मनांचा हा मेळ
पैक्याचा सारा खेळ
तिथं ज्ञानीयांची गत
काय सांगावी
फुगे मंडूक बेईमानी
सारे त्यालाच हो मानी
तिथं सत्याची जी गत
काय सांगावी
सारा नुसता बोभाटा
कलीयुगाचा फोपाटा
माणुसकीची परफट
काय सांगावी