Fall colors

सायंकाळी रवीकिरणांचे रंग सांडती नील नभावरती

रांगोळी हि या रंगांची दिन दिन झिरपते  पृथ्वीवरती

साठवून हे रंग कुपीत शरद उमलतो शुक झाडांवरती

केशरी लहर केशरी शहर केशरी प्रहर पर्णपानांवरती

शेंदुरी लाल रथात सवार सूर्य बहरतो तृण फांदीवरती

सुवर्ण आभा पितांबरी पिवळा कुंचला पीत वृक्षांवरती

वरमाला घेऊन युवती यौवनी लाली लाल गालावरती

सोनेरी पदर कस्तुरी अधर रस हेमांगी पर्णपानांवरती

अशी मदिरा असे मद्य कोणी उधळले बेधुंद रानावरती

पाऊसालाही रंग चढला इंद्रधनू सप्तरंगी डोंगरावरती

लाज सोडुनी चिनार गुलमोहर झुलतो नशेत घरांवरती

सुरेल गाणी महफिल दिवाणी रंगकहाणी पर्णपानांवरती

कृष्णाचा भास सुंदर महारास चंद्र पुनवेचा खास खगावरती

तारकाची रात गारवा ढगात प्रियकराची आस ओठांवरती

पानझडीचा नाच मोहिनी दवात कवि अवाक षड् ऋतूंवरती  

दिव्यांचा प्रकाश हेमंती आरास रमणीय प्रभात पर्णपानांवरती

अश्रूंचा आस्वाद निष्पर्ण कात उंच उभे ताठ घट्ट मूळांवरती

संपला मधुमास पानांचा प्रवास निजली निवांत जमिनीवरती

सूर्य उदास हिमाचा साद विरहाचा राग मंद मंद किरणांवरती

वैरागी वृक्ष अद्भुत मोक्ष शिशिर रुक्ष शुष्क पर्णपानांवरती

wish

विशाखा बेनोडेकर

Leave a Comment