द्विधा
लेखिका – स्वप्ना कुलकर्णी
चित्राने फोनवरचा मेसेज पुन्हा एकदा वाचला . गेले दोन तास ती फक्त हेच करत होती. शेवटी न रहावून ती उठली आणि तिने स्वतःसाठी coffee करायला घेतली. Coffee ढवळताना गेल्या काही वर्षांचा पट तिच्या नजरेसमोर उभा राहिला.
टोरोंटो युनिवर्सिटी मध्ये मास्टर्स केल्यानंतर तिला लगेचच नोकरी मिळाली होती. काही वर्षं टोरोंटोत काम करायचं आणि मग भारतात परतायचं असा तिचा बेत होता. अलेक्स ला भेटेपर्यंत आपण कायमचे कॅनडावासी होणार आहोत हे तिच्या स्वप्नातही नव्हतं.
एका मित्राच्या लग्नात अलेक्स तिला भेटला. एकाच टेबलवर त्यांची बसण्याची व्यवस्था केली असल्याने त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या.. हळूहळू भेटीगाठी वाढत गेल्या आणि ती अलेक्स मध्ये कधी गुंतली ते तिलाही कळलं नाही. वर्षभराने अलेक्सने तिला लग्नाबद्दल विचारलं.
खरं तर भारतातल्या आपल्या आईवडिलांना मनवणं थोडं कठीणच गेलं तिला. पण तिला हवी असलेली नवर्याची सगळी लक्षणं तिला अलेक्स मध्ये दिसत होती. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, भारतीय गोष्टीत रस घेणारा, व्यक्तीस्वातंत्र्य जपणारा हुशार अलेक्स. त्यामुळे ती तिच्या लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिली होती. मग हळूहळू आईवडिलांचा विरोध कमी झाला. आणि आता तर तो सगळ्यांचा लाडकाच झालाय.
तिचं लक्ष पुन्हा फोन कडे गेलं.
अलेक्स ने लंडनहून पाठवलेला तो मेसेज.
खरं तर ती अलेक्स ला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा त्याच्या stiff upper lip look मुळे तो कुठल्याही चित्रपटात इंग्रज म्हणून खपून जाईल असाच काहीतरी विचार आला होता तिच्या मनात. पण त्याच्याशी पूर्णपणे विसंगत होता त्याचा मोकळाढाकळा स्वभाव. नंतर त्याबद्दल कधीतरी ती त्याच्याशी बोलली तेव्हा तो आधी खूप हसला होता. मग कळलं की तो typical English look त्याच्या आईकडून आला होता. त्याची आई मूळची ब्रिटिश. पण तिची आई लहान असतानाच देवाघरी गेली आणि मग तिच्या वडिलांनी म्हणजे अलेक्सच्या आजोबानी पूर्ण कुटुंबासहित कॅनडात कायमचं स्थायिक व्हायचा निर्णय घेतला होता..
’I am a hard core Canadian now’. अलेक्स नेहमी म्हणायचा.
‘Good. नाहीतरी ब्रिटिशांवर माझा तसा दातच आहे. I don’t want to hurt your mom’s feelings पण आमच्या पूर्वजांनी फार वाईट दिवस पाहिलेत त्यांच्यामुळे.’
चित्राच्या या बोलण्यावर मग अलेक्सने जग कसं global होत चाललय यावर एक lecture दिलेलं.
कधीकधी तिलाही वाटायचं आपण गोरा नवरा केला कसा? विशेषतः आपल्या पेंडसे घराण्याने एवढं भोगलेलं असताना? आजही सव्वाशे वर्षांचा इतिहास सांगितला जातो आपल्याकडे .
विसाव्या शतकाची नुकतीच सुरुवात झालेली. देशभक्तीने पेटून उठलेले गोपाळ आणि गोविंद पेंडसे बंधू. जहाल चळवळीने भारलेले. इंग्रजांविरुद्ध च्या लढ्यात त्यांनी कॅप्टन स्कॉटचा खून केला. पण झालं काय ? या बंधुद्वयीवर केस करून तडकाफडकी फाशीची शिक्षा देण्यात आली. बचावाची संधीही मिळाली नाही.
खरी कहाणी त्याच्यापुढेच आहे ना पण!
दोन्ही तरुण मुलांनी हौतात्म्य पत्करल्यावर त्यांच्या आईवडिलांनी हाय खाल्ली. दोघांच्या तरुण, तरुण तरी कसं म्हणावं, खरं तर कोवळ्या वयाच्या बायकांना लाल आलवणात आयुष्य काढावं लागलं. शिक्षण नाही, कुणाकडून मदत नाही, पोट भरायचा देखील काही मार्ग नाही. खरं तर पेंडशांचा वंश तिथे संपायचाच पण मोठ्या रुक्मिणीबाई हे सर्वं झालं तेव्हा गरोदर होत्या. कसंबसं आपल्या माहेरच्या आधाराला जाऊन त्यांनी भास्कररावांना जन्म दिला.
धाकट्या सत्यभामाबाईनी आयुष्याला कंटाळून शेवटी विहीरीत जीव दिला.
रुक्मिणीबाई तेही करू शकत नव्हत्या. किती खस्ता खाल्ल्या असतील, किती टोमणे ऐकले असतील, पण भास्करला मोठं करायचं, त्याला शिकवायचं एकच ध्येय होतं त्यांच्यापुढे.
भास्कररावांनीही आईच्या कष्टांचं चीज केलं. प्रसंगी माधुकरी मागूनही ते शिकले. पण तेही पुन्हा स्वातंत्र्यचळवळीत सामिल झाल्यावर रुक्मिणीबाईनी हायच खाल्ली. पण सुदैवाने काही विपरीत घडलं नाही. पुढेपुढे पेंडशांचा वंश बहरला. भारताला स्वातंत्र्य मिळालं. दिवस पालटले. चित्राच्या आजोबांच्या पिढीने कष्टाने चांगले दिवस आणले आणि मग उत्तरोत्तर त्यांची प्रगतीच होत गेली.
किती भोगलंय आपल्या मागच्या पिढ्यांनी! पण आता खरंच किती बदललंय सगळं. काळ बदलल्यावर सगळी परिमाणंच बदलून जातात. ज्या कारणांसाठी त्यांनी बलिदान केलं ते कारणच उरलं नाहिये आता. आपण , आपली भावंडं multinational companies मध्ये काम करतो, सर्रास विदेशी गोष्टी वापरतो, एवढंच काय गोर्या माणसाशी लग्नं देखील करतो. अलेक्सलाही तिने कधीतरी हा इतिहास आणि तिचे विचार सांगितले होते. पण त्याचं आपलं नेहमीचच. सगळं जगच global झालय.
पण मग तरी हा इतिहास आठवून आपल्या काळजात कळ का उठते? विचार पुढारलेले असतील पण भूतकाळाशी जो धागा जुळलाय तोही तुटता तुटत नाही ना!
आणि आजचा हा अलेक्सचा मेसेज.
इंग्लंडला खरं तर तो कामानिमित्त गेला होता पण आपल्या आईच्या सांगण्यावरून तो तिच्या मामाला भेटायला त्याच्या घरी Oxford ला गेला होता. इंटरनेटमुळे आणि मागील काही वर्षांतील तिच्या England भेटीमुळे तिथल्या नातेवाईकांशी संबंध पुन्हा प्रस्थापित झाले होते. तिच्या दिवंगत आईला जोडणारा तिचा मामा हाच एक दुवा होता आणि म्हणूनच त्याची ख्याली खुशाली विचारुन येण्याची विनंती तिने अलेक्सला केली होती. पंच्यांशी वर्षांचे हे मामा आजोबा चांगले टुकटुकीत होते.. त्यांच्याशी बोलताना, जुने फोटो बघताना त्याच्या लक्षात आलं की चित्राच्या पूर्वजांनी ज्याचा वध केला तो कॅप्टन स्कॉट म्हणजे या मामा आजोबांचे आजोबा. थोडक्यात अलेक्स या कॅप्टन स्कॉटच्या वंशजांपैकीच एक.
’Honey, actually I did not want to mention this to you but you know I cannot keep secrets. Those times were different and now we should not let the deeds of our ancestors come between us.
I love you very very much.
Alex
किती सहजपणे अलेक्सने स्वीकार केलाय या सगळ्याचा. त्याला काय वाटलं असेल हे connection लक्षात आल्यावर? थोडा तरी धक्का बसलाच असेल ना. अलेक्स काळाबरोबर चालणारा व्यवहारी माणूस आहे. त्याने नीट विचार करूनच पाठवलाय हा मेसेज.
पण आपण? आपण अलेक्स सारखाच विचार करू शकू ना?
काळ बदलतो. राजकारण बदलतं, शत्रू राष्ट्र मित्र राष्ट्र बनतात पण जेव्हा सगळं वैयक्तिक पातळीवर येतं तेव्हा ते इतकं सोपं असतं का?
ज्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान बाळगत आपण मोठे झालो तो क्षणात विसरायचा? अजाणतेपणाने का होईना पण आपण आपल्या पूर्वजांशी गद्दारी तर केली नाही ना?
अलेक्सबरोबर संसार करताना हा इतिहास नजरेआड करता येईल ना आपल्याला? आपल्या पूर्वजांच्या सावल्या भेडसावणार तर नाहीत?
का आता आपल्या आयुष्यातच लिहिलंय या द्विधा मनःस्थितीत जगणं?
कपातली coffee थंड होत होती आणि चित्रा पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचत होती.
समाप्त