शिवरायस्तुती

तू त्राता तू युगप्रेरक दीनांचा तारणहार ।
त्रिवार वंदन हे शिवराजा करी प्रभो स्वीकार ॥धृ॥

पिचला अवघा महाराष्ट्र घोड्यांच्या टापांखाली ।
जुलुमांची लक्ष्मणरेखा मागेच पुसटशी झाली ॥
कळिकाळाचे आव्हानच हे कुणास पेलवणार ॥१॥

शतकांच्या अंधारानंतर सूर्योदय पण झाला ।
शिवनेरीवर शिवशंभू तव जन्म घेउनी आला ॥
सृष्टीच्या नवसृजनाचा तू जणू प्रथम ओंकार ॥२॥

समाज पेटुन उठला अवघा दिलीस जेव्हा हाक ।
त्या ठिणगीच्या वणव्यातुन झाली यवनांची राख ॥
निर्मिलेस तू स्वराज्य, करुनी दुष्टांचा संहार ॥३॥

घडविलास हर एक मावळा मूर्तिमंत जणु शौर्य ।
दिधले त्यांना रणांगणाचे शक्ति-युक्ति-चातुर्य ॥
म्हणता हर हर महादेव चढली खड्गांना धार ॥४॥

रणकुशल सेनेसोबत तुज प्रशासनाचे भान ।
रात्रंदिन तव अंतरातुनी प्रजाहिताचे ध्यान ॥
राजयोग आचरून दिधला सुराज्यास आकार ॥५॥

साधुसंतही तुझ्या सुराज्यामध्ये तोषुन गेले ।
सामान्यांनी असामान्य कर्तृत्व तुजमुळे केले ॥
लोहाचे जो करी स्वर्ण, तू परीस किमयागार ॥६॥

आठवता तुज जागृत होते अंतरातली शक्ती ।
स्मरणाने तव मिळते भय अन् अन्यायातुन मुक्ती ॥
तुला पूजिता पुरुषार्थाचा होतो साक्षात्कार ॥७॥

आज पुन्हा आम्हांस जाहली आत्मबलाची भ्रांती ।
शत्रुंहुनही घरभेदींनी हरली अमुची शांती ॥
असंख्य ’अफझल’ वधण्यासाठी घेई पुन्हा अवतार ॥८॥

आज पुन्हा दिसती गगनी त्या अंधाराच्या छाया ।
पुनश्च या निद्रिस्त समाजा क्षात्रतेज शिकवाया ॥
पुन्हा प्रकट व्हा भारतभूचा घेउनिया कैवार ॥९॥

आशिष रामचंद्र साबणे

Leave a Comment