कविता देवीस प्रार्थना
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
आनंदाचे येते भरते
वा नैराश्ये गळे कधी बळ|
उदासीनता कधी लपेटे
उत्साहाची नकळत सळसळ||
चैतन्याने मनात उर्मी
असह्य दुःखाची छळते झळ|
नैराश्याची कधी मुजोरी
वा स्फूर्तीने वर्धित मनबळ||
सत्व गुणाने कधी शांत मन
रजतम करिती बरेचदा छळ |
षड् रिपु डसता तनामनाला
अविचारांचा आवळतो गळ||
बालपणीची रम्य आठवण
कधी यौवनीची ती सळसळ|
खपली धरलेले काही क्षण
वाहू लागते जखम ती भळभळ||
ढवळुन निघता मनाचाच तळ
विचार लहरींचे उठते दल|
रंग बदलतो क्षणाक्षणाला
उमलत राही नित्य नवा पळ||
सगे सोयरे सखे सोबती
वेळ कुणा ना मनात कळकळ|
अंतरंग ना कुणी ओळखे
कानी घुमते तुझीच सळसळ||
गिर गिर गिरकी उंच भरारी
आश्वासनही तुझेच प्रेमळ|
भुलुनी जगता तुझ्या अंगणी
खेळ खेळता तुझाच अंमल||
अनोख्याच विश्वाची ओळख
लख्ख चांदणे खाली मखमल|
इंद्रधनुशी लपंडाव तो
सूर्याचीही लागे ना झळ ||
तरल भावनांची ती गूंफण
शब्दसुमांनी भरते ओंजळ|
प्रतिभेच्या रंगाची उधळण
रम्य रुप तव सुंदर सोज्वळ||
उमलू लागता काव्याचे दल
कस्तुरीहुनी मादक परिमल|
कविते देवी विनम्र वंदन
उजळशील ना शेवटचा पळ||
उजळशील ना शेवटचा पळ|||
सौ.अंजली जोशी .
विंडसर,कॅनडा
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘