आयुष्याचे दोन पाऊलं सुद्धा तिच्या शिवाय चालत येत नाही
चिमूटभर कवितेतून तीला मांडता येत नाही…..
मायेचेचे “अक्षयपात्र”अगम्य साक्षात देवी अन्नपूर्णा ती
माँ दुर्गा कधी काली माता ईश्वराचे वरदान ती
तिच्याशिवाय कुठलेही दिव्य ओलांडता येत नाही
चिमूटभर कवितेतून तीला मांडता येत नाही
बालपणीच्या परिकथेची परी करुणामयी सुंदर ती
स्पर्श तिचा असा जादुई जटिल जखमांचा उपचार ती
तिच्या आधाराशिवाय तान्हुल्याला रांगता येत नाही
चिमूट्भर कवितेतून तीला मांडता येत नाही
डोळे मिटून आठवण काढताच लगेच होते हजर ती
दृष्ट लागू नये माझ्या बाळाला सतत काढते नजर ती
अमाप तिच्या या प्रेमाला शब्दातुन सांगता येत नाही
चिमूटभर कवितेतून तीला मांडता येत नाही
श्वासोश्वासी तनी मनी आशिर्वादाचा अमृतघट ती
अशुभास हि शुभ करणारी मातृत्वाचा शक्तीपट ती
असीम या चैतन्य प्रवाहाला अक्षरात बांधता येत नाही
चिमूटभर कवितेतून तीला मांडता येत नाही
सारे ओझे मान अपमान हसतमुखाने पेलते ती
विसरून सारे ताप परिताप तिच्या कुशीत निजते मी
हा विसावा हि शांतता तपश्चर्येने साधता येत नाही
चिमूटभर कवितेतून तीला मांडता येत नाही
Wish
विशाखा बेनोडेकर